शिर्डीतील प्रसिद्ध चिन्ना राव यांच्या हॉटेलच्या मसाला डोस्यात चक्क झुरळ !ग्राहकाने केला FSSAI कडे थेट ऑनलाइन तक्रार; ₹520 चे बिल भरूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याचा आरोप.!!

शिर्डी म्हटलं की साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांसोबतच येथील खाद्यपदार्थांचीही चर्चा होते. शहरातील प्रसिद्ध दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांच्या हॉटेलमध्ये स्थानिकांसह भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. मात्र, याच पार्श्वभूमीवर एका प्रसिद्ध हॉटेलमधील खाद्यपदार्थाबाबत आलेली तक्रार खाद्यसुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण करणारी आहे.
शिर्डीतील प्रसिद्ध चिन्ना राव यांच्या साऊथ इंडियन हॉटेलमध्ये मसाला डोसा मागविल्यानंतर त्यामध्ये चक्क झुरळ आढळल्याचा दावा एका ग्राहकाने केला आहे. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ तसेच संबंधित तक्रारीची प्रत ग्राहकाकडे उपलब्ध असून, त्याने थेट FSSAI कडे ऑनलाइन तक्रार दाखल केल्याचे समोर आले आहे.

▪️नेमकं घडलं काय ?▪️

ग्राहकाच्या तक्रारीनुसार, शनिवारी शिर्डीतील एका स्थानिक कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन लहान मुले चिन्ना राव यांच्या हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ घेण्यासाठी गेले होते. त्यांनी डोसा, इडली आदी पदार्थांची ऑर्डर दिली.
मात्र, मसाला डोसा समोर आल्यानंतर त्यामध्ये झुरळ आढळल्याचा आरोप ग्राहकाने केला आहे. आपल्या कुटुंबासमोर असा प्रकार घडल्याने ग्राहकाला धक्का बसला. त्याने तत्काळ हॉटेलमधील कर्मचाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली.
मात्र, ग्राहकाच्या म्हणण्यानुसार, त्याला समाधानकारक उत्तर न देता प्रकरण थातूरमातूरपणे हाताळण्यात आले. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकारानंतरही ₹520 रुपयांचे बिल आकारण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

▪️तक्रार करूनही समाधान नाही; थेट FSSAI कडे धाव▪️

हॉटेलमध्ये तक्रार करूनही समाधानकारक तोडगा न निघाल्याने संबंधित ग्राहकाने वेळ न दवडता FSSAI कडे ऑनलाइन तक्रार दाखल केली.
महत्त्वाची बाब म्हणजे, केवळ तोंडी तक्रार न करता ग्राहकाने या घटनेशी संबंधित फोटो, व्हिडिओ आणि उपलब्ध पुरावे तक्रारीसोबत सादर केल्याचे सांगितले आहे.
त्यामुळे आता या तक्रारीची अधिकृत दखल घेतली जाते का ? संबंधित हॉटेलची पाहणी होते का ? खाद्यपदार्थांचे नमुने घेतले जातात का ? तसेच अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कोणती कारवाई होते, याकडे शिर्डीकरांचे लक्ष लागले आहे.

▪️प्रसिद्ध हॉटेल असल्याने जबाबदारीही मोठी ▪️

चिन्ना राव यांचे साऊथ इंडियन हॉटेल शिर्डीतील प्रसिद्ध खाद्यपदार्थांच्या ठिकाणांपैकी एक म्हणून ग्राहकांमध्ये परिचित आहे. विविध प्रकारच्या चटण्या, सांबर, मसाला डोसा, इडली, स्पेशल डोसा आणि दक्षिण भारतीय थाळीसाठी येथे मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी होत असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते.
अनेक स्थानिक नागरिक तसेच शिर्डीत येणारे भाविक या हॉटेलमध्ये खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात. त्यामुळे अशा ठिकाणी स्वच्छता आणि अन्नसुरक्षेचे निकष काटेकोरपणे पाळले जाणे अपेक्षित आहे.

▪️भेसळ प्रकरणानंतर आता खाद्य स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर▪️

शिर्डीत अलीकडच्या काळात भेसळयुक्त पेढे तसेच काही ठिकाणी भेसळयुक्त अन्नधान्य विक्रीच्या तक्रारी आणि त्यानंतर झालेल्या कारवायांची चर्चा सुरू असतानाच, आता प्रसिद्ध हॉटेलमधील खाद्यपदार्थात झुरळ आढळल्याची तक्रार समोर आली आहे.
त्यामुळे शिर्डीतील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या स्वच्छतेची तपासणी नियमितपणे होते का ? खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या ठिकाणी स्वच्छता नियमांचे पालन केले जाते का ? याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

▪️आता FSSAI काय कारवाई करणार?▪️

या संपूर्ण प्रकरणात ग्राहकाने थेट FSSAI कडे तक्रार केल्याने आता अन्न व औषध प्रशासन या तक्रारीची कितपत गांभीर्याने दखल घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कारण हा केवळ एका ग्राहकाच्या ताटातील झुरळाचा विषय नाही; अन्नपदार्थांच्या गुणवत्तेचा आणि ग्राहकांच्या आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न आहे.

▪️हॉटेल प्रशासनाकडून याबाबत नेमकी काय भूमिका मांडली जाते ? संबंधित खाद्यपदार्थ कसा तयार झाला ? स्वच्छतेच्या नियमांचे पालन झाले होते का ? आणि FSSAI अथवा अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणीत काय निष्पन्न होते ?
या प्रश्नांची उत्तरे आता संबंधित विभागाच्या कारवाईतूनच समोर येणार आहेत.

राजेंद्र भुजबळ
शिरडी MIRROR
संचालक, मुख्य संपादक शिर्डी.
8888777711

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *